गेल्या वर्षी नवरात्राच्या निमित्ताने आपण स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर येणाऱ्या आरोग्यविषयक नऊ आव्हानांचा विचार केला होता.
या वर्षी आपण स्त्रियांची मासिक पाळी, तिचे आरोग्यविषयक महत्व आणि वयाच्या विविध टप्प्यांवर बदलत जाणारे स्वरुप यांचा विचार आपण करू. खरंतर स्त्रियांचे आरोग्य हा हलकेच कुजबुजत बोलण्याचा विचार होता कालपरवापर्यंत, पण आता स्थिती बदलते आहे. माध्यमांमधून याबाबत प्रबोधन होत आहे. महिलासुद्धा जागरूक होऊन सजगतेने माहिती मिळवताना, बोलताना दिसतात तरीही काही गैरसमजुती, प्रथा आणि जुन्या प्रथांचे विकृतीकरण यामुळे आजही मासिक पाळीचे आरोग्य काहीसे दुर्लक्षितच आहे. ते नीट समजून घेण्यासाठी आपण प्रथम स्त्री प्रजनन संस्थेची रचना पाहू.
आयुर्वेदामध्ये स्त्री प्रजनन संस्थेचे वर्णन करताना बाह्य दोन पेशी व स्मरातपत्र ( Labia and clitoris ) तसेच दोन स्तन्याशय व आभ्यंतर एक गर्भाशय यांचे वर्णन आहे. यापैकी गर्भाशय हे स्त्री शरीरात बस्तिच्या ( Urinary Bladder) मागे , पक्वाशयाच्या (colon) पुढील बाजूस व भगास्थिच्या(pubic symphisis) मागे खालील बाजूस असतो. गर्भाशयाला योनीचा तिसरा आवर्त म्हटले आहे.यात बाहेरच्या बाजूस योनीमार्ग- Vagina(प्रथम आवर्त) , गर्भाशयमुख - Cervix (द्वितीय आवर्त) व गर्भाशय - Uterus and fallopian tubes (तृतीय आवर्त) असे वर्णन आहे.तसेच गर्भाशय हे आतील बाजूने ‘जरायु’ (Endometrium) नामक आवरणाने आच्छादित असते ज्यामध्ये ‘रज’धातु स्थित असतो,जो गर्भाचे पालन-पोषण करतो आणि मासिक धर्माचे नियमन करतो.
अंतफले हि दोन असतात व स्त्रीबीज उत्पत्ती आणि मासिक धर्माचे नियमन करतात असे वर्णन आहे.- योनीमार्ग म्हणजे Vagina ही पेशींपासून बनलेली नलिका बाह्य जननेंद्रिये गर्भाशय मुखाशी जोडते.शरीरात शुक्राचा प्रवेश आणि मासिक पाळीच्या वेळी रजःस्राव तसेच जन्माच्या वेळी शिशूचे बाहेर येणे यासाठी योनीमार्ग सुस्थित असणे आवश्यक आहे.
- गर्भाशयमुख म्हणजे Cervix हा गर्भाशयाचा खालचा निमुळता भाग आहे, जो योनी व गर्भाशयाला जोडतो. गरोदरपणात शिशूचे रक्षण आणि प्रसावच्या वेळी शिशूला वाट देण हे गर्भाशयमुखाचे कार्य आहे.
- गर्भाशय म्हणजे uterus हे लवचिक आणि ताकदवान पेशींच्या ३ स्तरांनी बनलेले असते.गर्भाशयाचे मुख्य कार्य म्हणजे फलित बीजसाठी पोषण, संरक्षण आणि पालनासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे तसेच जन्माच्या वेळी गर्भनिष्क्रमण आहे.
- अंतःफले म्हणजे Ovaries ही साधारण बदामाएवढ्या आकाराची अवयवांची जोडी गर्भाशयाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक अशी असते.या Ovaries मुळे स्त्रीबीज तसेच प्रजननासाठी आवश्यक संप्रेरकांची (Hormones) निर्मिती होते.
मासिक पाळीचे चक्र -
आयुर्वेदानुसार आर्तव म्हणजे गर्भधारणेच्या वेळी शुक्राशी संयोग पावणारे स्त्रीबीज तर रजःस्राव म्हणजे गर्भधारणा न झाल्यास दर महिन्याला जाणारा स्राव म्हणजेच ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो.रजः हा रसधातूचा उपधातू आहे.शुद्ध रज हे गुंजेच्या बीप्रमाणे, पायांना लावायच्या आळत्याप्रमाणे , लाखेच्या रसाप्रमाणे किंवा लाल कमळाच्या रंगप्रमाणे लाल असावे.(वय,प्रकृती,स्थान यानुसार लाल रंगामध्ये येणारे वैविध्य या छटांनी सांगितले आहे.) तसेच त्याचा कापडावर डाग पडला तर धुवून सहज नाहीस व्हावा. रजःस्रावाचा कालावधी महिन्यातून एकदा, तीन ते पाच रात्रीपर्यंत असावा.रजःस्राव अति जास्त किंवा अटी अल्प नसावा.चिकट, बुळबुळीत किंवा दुर्गंधी नसावा. रजःस्रावाच्या कालावधीत कोणताही दाह , शूल , वेदना नसाव्यात. थोड्या प्रमाणात थकवा असणे प्राकृत आहे.
क्रमशः
No comments:
Post a Comment