महिन्यातील “ते” दिवस लेखमाला - भाग ५वा
पन्नाशी जवळ आली की बायकांना जरा धाकधूक वाटू लागते.वयात आल्यापासून दर महिन्याला सोबत करणारी “ती” सखी हळूहळू दुरावत असते ना.. खरं तर दर महिन्याला “ती” येणार म्हटलं की सणवार,पाहुणे-रावळे यांच्या आणि “हिच्या” तारखा तपासताना “कधी बरं जाणार ही कायमची” हा विचार प्रत्येकीच्या मनात कधी ना कधी डोकावलेला असतोच पण आता ती खरंच जाणार म्हटल्यावर तिचे फायदे-तोटे, इतरांचे अनुभव ऐकून बायकांना जरा धस्स होतंच.
आता गेले काही दिवस ही लेखमाला वाचणाऱ्यांना “तिची” वेगळी ओळख करून द्यायला नकोच. “ती” म्हणजे ‘असून अडचण , नसून खोळंबा ‘ अशी मासिक पाळी आणि आजचा आपला विषय आहे “रजोनिवृत्ती” म्हणजेच Menopause.
रजोनिवृत्ती म्हणजे मासिक पाळी नैसर्गिकरित्या बंद होणे.हे सामान्यतः वयाच्या ४०-५० वर्षांपर्यंत घडून येते. रजोनिवृत्तीच्या वयावरसुद्धा प्रकृती, देश,काळ,जीवनपद्धती, अनुवंशिकता तसेच ताण-तणाव यांचा प्रभाव असतोच.या काळात Ovaries चे कार्य थांबलेले असते व संप्रेरकांचा अभाव होतो.आयुर्वेदानुसार ही स्थिती वातप्रकोपामुळे होते.रजोनिवृत्तीची लक्षणे पुढीलप्रमाणे,
- मासिक पाळी पूर्णपणे थांबणे (या वयात सलग १२ महिने पाळी न आल्यास रजोनिवृत्ती सुरु झाली असे मानले जाते.)
- कंबर दुखणे
- डोकेदुखी
- कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणे
- मळमळल्याची भावना
- अचानक अंगाला घाम फुटणे
- Hot flushes
- भुकेच्या तक्रारी जसे की अन्नावर वासना नसणे, भूक कमी होणे,चव न जाणवणे
- उदरप्रदेशी वेदना
- स्तनप्रदेशी वेदना
- भावनाप्रधानता
- नैराश्य, दुःख जास्त जाणवणे
- नकारात्मक विचार मनात येणे
- ताण-तणाव
- वजन वाढणे
- योनीप्रदेशी शुष्कता (योनीप्रदेशी असलेल्या ग्रंथींद्वारे होणारा स्राव थांबल्यामुळे)
- त्यामुळे लैंगिक संबंधाची इच्छा नसणे, समागमाच्या वेळी वेदना होणे
- स्नायूंना शैथिल्य आल्यामुळे मूत्राशयाला शैथिल्य
- त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना लघवी होणे किंवा वारंवार लघवीला यावेसे वाटणे
यापैकी एक किंवा अधिक त्रास जाणवू लागतात.यांची तीव्रता ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे व्यक्तिसापेक्ष असते.
अशा वेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय केल्यास रजोनिवृत्तीचा काळ सुसह्य होतो. या काळात पित्त-वात दोषाचे प्राबल्य असते त्यामुळे चिकित्सासुद्धा पित्त-वाताचीच असते.
- रोज हलक्या स्वरुपाचा व्यायाम करावा.ज्यामुळे शरीर लवचिक व काटक राहण्यास मदत होते.
- व्यायामानंतर वातशमनासाठी तेलाने मालिश करावे.(हे तेल प्रकृतीसापेक्ष वेगवेगळे वापरले जाते.)
- प्राणायाम आणि ध्यानधारणेचा अभ्यास करावा म्हणजे मनःशांती मिळते.
- तरीही मानसिक दैन्य,निराशा नकारात्मक विचार मनात येत असल्यास मनाला आवडतील असे छंद जोपासावे, सामाजिक कार्यात गुंतवून घ्यावे.
- तरीही ताण-तणाव जाणवत असतील तर समुपदेशकाची मदत घेता येईल.
- मानसिक त्रास टाळण्यासाठी सर्वात मोठी भूमिका कुटुंबाचे सदस्य बजावतात. त्यामुळे पती-मुले-सुना-जावई-नातवंडे या सर्वांशी मोकळेपणे आपल्या त्रासांबद्दल बोलावे व सदस्यांनीसुद्धा बाऊ न करता आपल्या घरातील कर्त्या स्त्रीला समजून घ्यावे व या स्थित्यंतरातून यशस्वीपणे जाताना त्यांना त्यांचा वेळ द्यावा,मदत करावी
- वैद्यकीय सल्ला - रजोनिवृत्तीची लक्षणे तशी सौम्य स्वरुपाची असतात मात्र स्तनांमध्ये गाठ/वेदना, रक्ताच्या गुठळ्या होणे, अकस्मात रक्तस्राव,अचानक अतिप्रमाणात घाम येणे किंवा तीव्र स्वरुपाचे मानसिक नैराश्य अशी काही लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- आयुर्वेदिक चिकित्सेमध्ये समुपदेशन, पंचकर्म आणि तीव्र स्वरूपाच्या लक्षणांची औषधी चिकित्सा केली जाते.
त्यामुळे स्त्रियांनी आणि त्यांच्या घरच्यांनीसुद्धा हे समजून घ्यावे की रजोनिवृत्ती हा कोणताही आजार नसून एक नैसर्गिक अवस्था आहे आणि शरीराच्या या संकेतांना वेळीच समजून त्यानुसार उपाययोजना केल्या तर आयुष्याच्या या शिशिर ऋतूतही पानगळीऐवजी वसंताची पालवी अनुभवास येईल.
( समाप्त)
No comments:
Post a Comment