महिन्यातील “ते” दिवस लेखमाला - तरुणावस्थेतील मासिक पाळी.
प्रजनन संस्थेची रचना आणि किशोरावस्थेतील मासिक पाळीचे स्वरूप पाहिल्यानंतर आजचा विषय आहे, तरुणावस्थेतील मासिक पाळी.
या लेखात आपण १८ ते ४० या वयोमर्यादेतील तरुणींचा विचार करणार आहोत.या काळात प्रजनन संस्थेचा पूर्ण विकास झालेला असून मातृत्वासाठी शरीर तयार असते. त्यामुळे या खूप महत्वाच्या जबाबदारीसाठी शरीर आणि मन तयार करणे आवश्यक असते.
याच काळात मुली आपले १२वी/पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेत असतात व परिस्थितीनुसार करिअर, लग्न, मुले-बाले आणि घराच्या जबाबदाऱ्यासुद्धा उचलत असतात. हे सगळे मॅनेज करताना त्यांच्या शारीरिक, मानसिक क्षमतांचा कस लागत असतो आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्यामुळे योग्य वेळी काळजी घेणे गरजेचे आहे.
मासिक पाळी आणि स्त्री शरीरातील संप्रेरके ही मातृत्व तसेच इतर शारीरस्वास्थ्यासाठी महत्वाची असल्याने मासिक पाळीकडेही लक्ष द्यावे.यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि तणावमुक्त मनःस्थिती अत्यंत महत्वाची आहे कारण यामुळे संप्रेरकांचा स्राव योग्य आणि नियमित होतो.
मासिक पाळी म्हणजेच ऋतुचक्र (ऋतू - गर्भधारणेसाठी अनुकूल असा काळ) . हे ऋतुचक्र दर महिन्याला नियमित असावे. किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळात अनियमित किंवा कमी/अधिक स्राव असेल तरी तो या वयापर्यंत नियमित व्हावा व आधी वर्णन केल्याप्रमाणे ( लेख १) गुणांचा असावा.
ऋतुचक्र हे दोषांनुसार , ३ अवस्थांमध्ये विभाजित असते, ज्यात अनुक्रमे कफ , पित्त आणि वात दोषाचे प्राबल्य असते.
- ऋतुकाळ - या काळात शरीर गर्भधानासाठी तयार होत असते. त्यासाठी जरायु (Endometrium)ची आणि स्त्री-बीजाची वाढ होत असते.आयुर्वेदानुसार वाढीच्या काळात कफ दोष आवश्यक असतो त्यामुळे स्वभावतः ही अवस्था कफदोषप्रधान आहे.
- ऋतुव्यतीत काळ - ही पित्त प्रधान अवस्था आहे. या काळात स्त्री-बीज अंतःफलातून गर्भाशयात आलेले असते.
- रजःस्राव काळ - गर्भधारणा न झाल्यास रजःस्राव काळात मासिक पाळीची सुरुवात होते. ही वातप्रधान अवस्था. त्यामुळे जर शरीरात वात प्रकोपाची स्थिती असेल तर पाळी सुरु होण्यापूर्वी किंवा सुरुवातीच्या दिवसांत भावनाप्रधानता , डोकेदुखी,आम्लपित्त, पायात पेटके येणं, ओटी-पोटात दुखणे अशी लक्षणे दिसतात.
म्हणून या काळात आधी वर्णन केल्याप्रमाणे (लेख २) दिनचर्या पाळावी. आहारात गरम पाणी व गरम ,पचायला हलके अन्न घ्यावे. सध्या शिक्षण/नोकरीच्या निमित्ताने स्त्रियांचे फिरणे,अधिक काळासाठी घराबाहेर राहणे होते,अशा वेळी किंवा पार्टीच्या निमित्ताने वारंवार बाहेरचे खाणे होते. त्या पदार्थांची स्वच्छता,खाण्याचा दर्जा किंवा घटक हे दररोज खाण्याच्या लायकीचे नसतात. त्यामुळे शक्यतो घरचेच अन्न खाण्याचा कसोशीने प्रयत्न करावा.
आता यावर काहीजणी म्हणतील की जर आम्हाला काहीच त्रास दिसून येत नसतील तर आम्ही हे सर्व पथ्य, दिनचर्येचे नियम वगैरे का पाळायचे? तर त्यांना माझा असा सल्ला आहे की वयाच्या १८/२२/२५/३० व्या वर्षी तुम्हाला काही त्रास नसणे हे योग्यच आहे कारण आपले शरीर फार सोशिक असते.आपण जो त्यावर अत्याचार करतो त्याच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न हि करते पण त्यालाही काही मर्यादा असतात.त्यामुळे जर वयाच्या ५०/६०/७०/८० व्या वर्षी त्रास भोगायचे नसतील तर हे आवश्यक आहे.
मासिकपाळी देवधर्म आणि पाळी लांबवण्याच्या गोळ्या -
देवधर्मासाठी, लग्न किंवा इतर समारंभासाठी ,सहलीसाठी म्हणून गोळ्या घेऊन येणारी पाळी पुढे ढकलणे आपल्याकडे सर्रास चालते.या गोळ्या बहुतांशी Progesterone या संप्रेरकांपासून बनलेल्या असतात.ज्या घेतल्या की ऋतुकाळाचा कालावधी लांबवता येतो जेणेकरून रजःस्राव होत नाही. पण हे करताना बायकांच्या लक्षातच येत नाही की आपण शरीरधर्मानुसार नियमितपणे चालणाऱ्या एक क्रियेत अनावश्यक हस्तक्षेप करत आहोत.हे म्हणजे एखाद्या सुरळीत सुरु असणाऱ्या automated machine/software मध्य आपण अधीर होऊन घिसाडघाईने काही manual entries केल्या तर काय होईल?काही काळ ते यंत्र सहन करेल किंवा त्याचा वेग मंद होईल व ते error दाखवेल किंवा कायमचे बंद पडेल मग त्याचप्रमाणे सतत, वेळीअवेळी घेतल्या जाणाऱ्या या गोळ्या शरीरचक्र बिघडवतात. वेळीअवेळी पाळी येणे.रजःस्राव कमी किंवा जास्त होणे,पाळीच्या वेळी वेदना,रक्ताच्या गुठळ्या किंवा स्तनांमध्ये वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. मासिक पाळीशी अशी छेड-छाड करू नये.
क्रमशः
पुढील विषय : रजोनिवृत्तीचा काळ - ४५ ते ५० वर्षांपुढे
No comments:
Post a Comment