।। श्री धन्वन्तरये नमः ।।
सर्वप्रथम दीपावलीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा. आज धनत्रयोदशी.सगळीकडे आजच्या दिवशी धनाची,संपत्तीची पूजा केली जाते.आम्ही आयुर्वेदिक वैद्यसुद्धा पूजा करतो पण ही पूजा असते,आरोग्यरूपी धनाची. कारण धनत्रयोदशी हा आयुर्वेदशास्त्राची देवता भगवान धन्वन्तरी यांची जयंती सुद्धा आहे.
धन्वन्तरी हे भगवान विष्णूंचा अवतार मानला जातो.अमृतप्राप्तीसाठी जे समुद्रमंथन केले गेले त्यातून बाहेर आलेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे धन्वन्तरी. बहे उत्तम आयुर्वेदज्ञ होते. त्यांनी सुरु केलेल्या रोग्यचिकित्सेच्या कार्यात विविध आचार्य,ऋषी-मुनींनी आपापल्या अनुभव,ज्ञानाची भर घातली आणि विस्तृत आयुर्वेद शास्त्र निर्माण होत गेले. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे आदि आचार्य भगवान धन्वन्तरींचे पूजन सर्व वैद्य मोठया उत्साहात करतात व यानिमित्ताने आयुर्वेदाशी संबंधित कार्यक्रम,चर्चासत्रे, रुग्णशिबिरे आयोजित केली जातात.
यावर्षी धनत्रयोदशीचे महत्व खास आहे कारण आयुर्वेदाला मिळत असलेला राजाश्रय. आयुर्वेदाचे महत्व, कालातीत असणे व सध्याच्या जीवनात आयुर्वेदाची निकड हे लक्षात घेऊन भारत सरकारने ‘धनत्रयोदशी’ हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. कोणी म्हणेल यात खास ते काय?योग दिवस तसा आयुर्वेद दिवस,झालं!! पण ते तसे तितके सहज नाही. आयुर्वेदाला सरकारी पातळीवर मान्यता मिळते आहे याचे हे दर्शक आहे. जागृती ,मान्यता आणि उपयोजन ( mass Awareness ,availability and acceptance) यासाठी हे महत्वाचे आहे. यामुळे आयुर्वेद प्रसाराला चालना मिळेल,आयुर्वेदाविषयी जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न होतील. असे म्हणताना फक्त परदेशी पर्यटक आणि मेडिकल टुरिझम एवढा संकुचित विचार अपेक्षित नसून भारताच्या तळागाळातील लोकांनाही त्यांच्या या आयुर्वेदाचे लाभ मिळणे अपेक्षित आहे.
- यासाठी सार्वजनिक आरोग्यसेवेचा महत्वाचा वाटा आहे. सर्वच सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यामध्ये आयुर्वेदाची OPD व औषधे उपलब्ध असावीत,ती शिक्षित व पात्र आयुर्वेदिक वैद्यांकडून योग्य तपासणीनंतर दिली गेली तर सामान्यांना सहज,खात्रीशीर उपलब्ध होतील.
- सामान्यांना दर्जेदार औषधे रास्त दरात मिळावी यासाठी आयुर्वेदिक फार्मसी असाव्यात
- औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच औषधी वनस्पती मुबलक उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचे शास्त्रशुद्ध व सेंद्रिय उत्पादन घ्यावे लागेल. यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे.
राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे बोधचिन्ह
No comments:
Post a Comment