सकाळी -सकाळी फोन किणकिणला तेव्हा श्रियाच्या आईचा काळजीयुक्त सूर ऐकून स्निग्धाला वाटले की श्रियाच्या स्पर्धेच्या प्रकल्पाची काही अडचण असेल. पण सोनिया जरा जास्तच काळजीत होती.
“खूप टेन्शन येतं गं मला, काही सुचत नाही. सगळं ठीक असल्याचा आव आणते मी , मुलांबरोबर,घरकामात मन रमवते पण सतत मनाला घोर लागून राहतो. अनिलला रोज ड्युटीसाठी बाहेर जावं लागतच. तो घरी आल्यावर पटकन आंघोळ करतो. त्याचे कपडे चटकन धुवून टाकतो. त्याचे बूट, गाडीची चावी निर्जंतुक करणे वगैरे सगळी खबरदारी आम्ही घेतो. तो आमच्याशी थेट संपर्कसुद्धा टाळतो. पण तरीही मला काळजी राहते. परवाच त्याच्या काही सहकाऱ्यांची टेस्ट पॉसिटीव्ह आली. संजय त्यांच्या थेट संपर्कात नव्हता पण तरीही माझ्या जीवाची घालमेल होत राहते. काय करता येईल गं? घरी आम्ही सगळेजण तू पाठवलेले आयुर्वेदिक उपाय पाळतो. पिल्सपण मिळाल्या आहेत आमच्या सोसायटीमध्ये. च्यवनप्राश मिळतच नाहीये सध्या, तोही घ्यायला हवाच आता कुठूनतरी. आईपण आहेत ना घरी, त्यांचे BP, शुगर. त्यात आता जून महिना आल्यावर काय होतंय, श्रीया-आर्यनच्या शाळा-कॉलेजेसचं कसं होईल? खूपच काळजी वाटते गं मला.......”
“हो, हो, अगं जरा दम घे.किती काळजी करशील? ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात ना त्यातली गत झालीये तुझी.”
“हो ना गं, म्हणतात ना, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ त्यातली गत.”
“मला तुझं काळजी करणं समजतं. सुरुवातीला साध्य सर्दी-तापाची लक्षणे दाखवणारा हा आजार पाहता-पाहता माणसाला अत्यवस्थ करतो आणि त्यासाठी अजूनही काही सुनिश्चित चिकित्सा (Definitive Treatment ) किंवा लस (Vaccine) नाही हेच सर्वांना चिंताक्रांत करते आहे.
पण तू दुसरी बाजूसुद्धा बघ ना, कोरोनाची बाधा होऊनही बरे होणारे कितीतरी रुग्ण आहेत. आजच्या घडीला भारतात एकूण _१७४००० कोरोनाबाधित रुग्ण नोंदले गेले आणि त्यापैकी बरे झालेले ८२३७० रुग्ण आहेत तर ४९७१ मृत्यू_ झाले आहेत. म्हणजे प्रत्येक कोरोनाबाधिताचा मृत्यू अटळ नाही उलट याआधी आलेल्या साथींपेक्षा बरीच कमी मारकता आहे या आजाराची. बरं दुसरी गोष्ट अशी की जे मृत्यू झाले आहेत, त्यापैकी बहुतांश व्यक्तींना आधीच काहीनाकाही आजार होते. उदा. - मधुमेह,उच्च रक्तदाब,किडनीचे आजार, श्वसनाचे आजार, हृदयविकार,स्थूलता. तसेच साठीपलीकडच्या व्यक्ती ज्यांना असे आजार होते, बळी पडल्या आहेत. _विज्ञानाच्या भाषेत याला Co-morbidity असे म्हणतात. म्हणजे आधीपासूनच आजारांनी जर्जर झालेल्या शरीरात जेव्हा कोरोना संसर्ग झाला, तेव्हा गुंतागुंतीची (Health Complications)ची शक्यता_ वाढते. जी जीवावर बेतू शकते.
“ओके , मग आता गं? आईंना आहेच ना BP /sugar, अनिललासुद्धा कोलेस्टेरॉलचा त्रास आहेच. अजून काही इम्युनिटी बूस्टर्स नाहीत का?किंवा आयुर्वेदिक लस वगैरे?”
“सोनिया,हरदासाची कथा परत मूळपदावर येते आहे. तुझं गोंधळलेपण,अगतिकता लक्षात येतेय माझ्या पण आयुर्वेदिक लस असे काही प्रकार नाहीत गं. मुळात लस म्हणजे तरी काय?तर एखाद्या *संसर्गजन्य जीवाणू किंवा विषाणू (अनुक्रमे Bacterias आणि Viruses ) यांचे सूक्ष्मभाग ( ज्यांना Live attenuated किंवा Toxoids असे म्हणतात.) शरीरात प्रविष्ट केले जातात. त्यांना प्रतिसाद म्हणून शरीर प्रतिपिंडे(Antibodies) करते. मग पुढे आजाराचे विषाणू/जिवाणू शरीरात संसर्ग करण्याच्या तयारीत असतील तर antibodies त्यांचा फडशा पडतात. तसेच भविष्यात कधी पुन्हा त्या आजाराचा धोका असेल तर शरीराला त्याची आठवणसुद्धा करून देतात.* पण ही अश्या प्रकारची रोगप्रतिकारक्षमता त्या-त्या आजारापुरताच असते आणि प्रामुख्याने संसर्गजन्य आजारांसाठीच असते.पण आयुर्वेदात वर्णन केलेले *व्याधीक्षमत्त्व* हे या सगळ्यांपेक्षा खूप व्यापक आहे. Immunity म्हणजे जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या आजाराविरुद्ध असलेली रोगप्रतिकारकक्षमता एवढाच अर्थ न घेता, *प्रत्येक आजाराचा (Systemic diseases, infectious diseases,Allergic disease and even Autoimmune diseases) यथाशक्ती प्रतिकार करण्याची शरीराची ताकद* असा घेतला पाहिजे. त्यामुळे व्याधीक्षमत्त्वासाठी ‘पी हळद न हो गोरी’ असा *कोणताही इन्स्टंट फॉर्मुला नाही.* फक्त काढे,पिल्स घेऊन नाही तर त्यांचा *नियमित सराव गरजेचा* आहे.
त्याही पुढे जाऊन आचार्य म्हणतात,
*‘समदोष: समाग्निश्च समधातु मल:क्रिया ।
प्रसन्नात्मेन्द्रियमनसश्चेति स्वस्थ इत्याभिधियते ।।*
म्हणजे ज्या व्यक्तीचे _त्रिदोष (वात -पित्त-कफ) , अग्नि म्हणजे पचन आणि सूक्ष्मपचन (digestion & metabolism), सप्तधातू (रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र), तीन मल (मल,मूत्र-घाम) यांचे व्यापार नियमित आणि प्रमाणात सुरु असतात.आत्मा, एकादश इंद्रिये आणि मन यांचा एकमेकांशी योग्य ताळमेळ_ असतो. अश्या व्यक्तीला स्वस्थ म्हणावे. नीट विचार केलास तर ही *इसवीसनपूर्व ६०० साली केलेली व्याख्या* WHO ने १९४८ साली वर्णन केलेल्या _Health is a state of complete physical, mental, and social well-being, not merely the absence of disease or infirmity_. या व्याख्येचे सगळे निकष तर करतेच पण अधिक सूक्ष्मतेने विचार करणारी आणि परिपूर्ण आहे.”
“पण मग हे सर्व सगळे शरीरघटक समावस्थेत असतात का?”
“नाही , कारण *गर्भधारणेच्या वेळी आपली जनुकीय घडण (Genetic makeup), त्या वेळेचा ऋतू,राहता देश यावर गर्भाची प्रकृती* ठरत असते. त्या प्रकृतीच्या अनुषंगाने आहार-विहार करत आरोग्य सांभाळणे म्हणजे व्याधीक्षमत्त्व कायम राखणे. यासाठी *दिनचर्या-ऋतुचर्या आणि पंचकर्मादि उपचार* सांगितले आहेत. *आपला दिनक्रम - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करावे-काय टाळावे, म्हणजे दिनचर्या.* उदा.- दात घासताना टूथपेस्ट वापरावी का?ब्रश कसा असावा?व्यायाम का आणि कसा करायचा?आहार किती आणि कोणता या आणि अश्या अनेक दिनचर्येच्या उपायांबद्दल आचार्यांनी विस्ताराने सांगितले आहे. तसेच *ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळायचे पथ्य.* कारण पृथ्वीच्या परिवलन-परिभ्रमण गतीमुळे, स्वतःच्या अंशाभोवती कळण्यामुळे निसर्गात होणारे दिवस-रात्र, ऋतुमानाचे बदल शरीरावर दिसतात. त्यानुसार त्रिदोषांचा नैसर्गिकरित्या संचय-प्रकोप-शमन होत असतो. तेव्हा *त्या-त्या ऋतूनुसार आहार-विहार आधी सांगितल्याप्रमाणे दोष-धातू-मलांचे सात्म्य राखण्यास मदत करतो.* ”
“पण तरीही अश्या काही गोष्टी असतीलच ना, नाहीतर मग प्रत्येकजण दीर्घायुषी होईल.”
“बरोबर आहे तुझं म्हणणं,पण आधी सांगितल्याप्रमाणे, *प्रकृती हा एक महत्त्वाचा घटक* आहे तसेच सध्याच्या काळात बऱ्याच जणांना *चुकीच्या जीवनशैलीमुळे प्रकृतीच्या तक्रारी असतातच. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जन्मतः दुर्बल प्रकृती असणारे, स्थूल, सतत चुकीच्या वेळी किंवा नेहमीच्या आहारापेक्षा वेगळा आहार घेणाऱ्या व्यक्ती (असात्म्य आहार), मानसिकरित्या दुर्बल व्यक्ती (अल्पसत्त्व) यांना आजार पटकन गाठतात.* ”
“हो , व्यवहारातही हे दिसताच की मनाने कच खाल्ली तर साधा आजारही जीवघेणा ठरतो आणि मन खंबीर असेल तर असाध्य आजारांतूनही लोक बरे झाले आहेत.”
“बरोब्बर, म्हणून *नियमित वेळी,घरी शिजवलेला-ताजा आहार घेणं, रोज व्यायाम-योगासने-प्राणायाम करणं, आवश्यक तेवढी झोप घेणं,नियमित पंचकर्म करून घेणं हे गरजेचं* आहे. मात्र हे *उपचार करताना आणि आधीपासूनच काही आजार असतील तर आपल्या जीवनशैलीप्रमाणे आवश्यक असा ऋतूनुसार आहार-विहार नीट वैद्यांच्या सल्ल्यानेच* ठरवून घ्यावा. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने एकच सरसकट डाएट प्लॅन सगळ्यांनीच दामटून करणे हे अजिबात योग्य नाही.
त्याबरोबर हेसुद्धा समजून घ्यावं लागेल की आता हळूहळू लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची प्रक्रिया सुरु होईल. कारण कायमस्वरूपी लॉकडाऊन शक्यच नाही. आणि जगभरातील देशोदेशीच्या एपिडेमीओलॉजिस्टस नी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कदाचित पुढचे वर्षभर तरी कोरोनाची लक्षणे दाखवणारे रुग्ण दिसून येऊ शकतील. पुन्हा पुन्हा waves सारखे येऊ शकेल हे infection. त्यामुळे वर नमूद केलेल्या उपायांनी आपले *व्याधीक्षमत्त्व चांगले ठेवणे, सोशल डिस्टंसिन्ग पाळणे,मास्क वापरणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, अनावश्यक स्पर्श टाळणे,गर्दीची ठिकाणे टाळणे* या गोष्टी आपल्याला मनात पक्क्या बसवाव्या लागतील. पुढे कधीही सर्दी-तापाची लक्षणे दिसली तर पूर्वीसारखे ‘काही नाही,साधा वायरल तर आहे.’ असे म्हणून गाफील न राहता *वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे,स्वतःला इतरांपासून थोडे विलग ठेवणे* गरजेचे राहील.तरंच ही कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकता येईल.”
“बरं वाटलं गं तुझ्याशी बोलून. आजपासूनच आम्ही ही सप्तसूत्री कटाक्षाने पाळू.”
टीप - वैद्यांचा सल्ला घेताना ते शिक्षित आणि नोंदणीकृत वैद्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
डॉ. स्निग्धा चुरी-वर्तक.
9870690689
(सदर लेख वैद्य स्निग्धा चुरी-वर्तक यांनी ३१ मे २०२० रोजी आपल्या *https://samanwayayurved.blogspot.com/2020/05/blog-post_30.html* या ब्लॉगवर प्रथम प्रकाशित केला. याचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत. इतरत्र शेअर करायचे असल्यास कृृपया कोणतेही बदल न करता व मूळ लेखिकेच्या नावासहित शेेेअर करावा.)
No comments:
Post a Comment